मूळ अकोलेकर लांडेंच्या पथकाने हिमाचलमध्ये पकडले ड्रग्ज तस्कर Drug smugglers nabbed in Himachal by Akolekar Lande’s team
नागपूर : बिहारमध्ये सिंघमस्टाइल कारवाईंमुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी मुंबईत, पुण्यातून धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. विदर्भातील मूळ अकोला जिल्ह्याचे लांडे सध्या महाराष्ट्र दहशतवादी विरोधी विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक आहेत.
लांडे यांच्या पथकातील महाराष्ट्र एटीएसने ड्रग्ज रॅकेटवर चाप लावण्यास सुरूवात केली आहे. एटीएसच्या विशेष पथकांनी मंगळवार, २ मार्चला हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांत छापे टाकत दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन जणांकडून मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती एसटीएसच्या सूत्रांनी दिली. कुल्लू जिल्ह्यातील हॉटेल मनाली क्रिम येथे चरस तस्करी करणाऱ्या टोळीत महत्त्वाची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती शिवदीप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला हिमाचल येथे छापा घालण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्रातून निघाल्यापासून लांडे हे स्वत: पूर्णवेळ पथकाच्या संपर्कात होते. सापळा रचून हॉटेलमध्ये छापा घालण्यात आला. विशेष म्हणजे छापामार कारवाई सुरू असताना लांडे यांच्यासह पथकातील प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात होता. एटीएसची चाहूल लागताच तस्करांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र टोळीचा सूत्रधार रूमी ठाकूर पोलिसांच्या हाती लागला. रुमीला बुधवार, ३ मार्चला पुण्यातील न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. रूमी ठाकूर कुल्लू मनालीतील रिव्हर व्ह्यू नावाचे हॉटेल चालवितो. मुंबई, गोवा, बेंगळुरू, पुण्यात चरस पुरविण्यात त्याचा हात आहे. टोळीतील अन्य सदस्यांचा शोधही एटीएसने सुरू केला आहे. या टोळीचे नागपूरसह महाराष्ट्रात कुठे-कुठे कनेक्शन आहे, याचा शोधही घेण्यात येत आहे. पुण्यात डिसेंबर २०२०मध्ये पोलिसांनी ३२ किलो चरससह हिमाचलच्या दोन जणांना अटक केली होती. या अमलीपदार्थाची किंमत १.२० कोटी होती. तेव्हापासून एटीएस अमलीपदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीच्या मागावर होती.