राज्यात दुसऱया टप्प्यात आज 263 ठिकाणी ड्राय रन
बेंगळूर
कोरोनावरील लसीला केंद्र सरकारने मान्यता दिली असून लवकरच लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लसीचे दुसऱया टप्प्यातील ड्राय रन (रंगीत तालिम) शुक्रवारी होणार आहे. राज्यातील 263 ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालिम होणार आहे. त्यासाठी आरोग्य खाते सज्ज आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनावरील लसीचे वितरण आणि केंद्र सरकारकडून आवश्यक मदत याविषयी सभेमध्ये चर्चा झाली आहे. 8 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्हय़ातील किमान तीन ठिकाणी लसीकरणाचा सराव करणे आवश्यक आहे. मात्र कर्नाटकात प्रत्येक जिल्हय़ात 7 ठिकाणी रंगीत तालिम केली जाणार आहे. त्याकरिता 263 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. 24 जिल्हा इस्पितळे, 20 वैद्यकीय महाविद्यालये, 43 तालुका इस्पितळे, 31 समुदाय आरोग्य केंद्रे, 87 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 30 शहर प्राथमिक आरोग्य केंद्रे, 28 खासगी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची रंगीत तालिम होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारने 24 लाख सिरींज पाठवून दिले आहेत. ते सर्व जिल्हय़ांना पाठविण्यात आले आहेत. राज्यात लस साठविण्यासाठी 10 वॉक इन कुलर, 4 वॉक इन फ्रिजर, 3,201 आयएलआर, 3,039 डीप फ्रिजर, 3,312 कोल्ड बॉक्स, व इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
65 लाख मुलांना पोलिओ लस
लसीमुळे कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत. 17 जानेवारी रोजी पोलिओ लसीकरण होणार आहे. एकूण 65 लाख मुलांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे.