बिनधास्त अंडी – चिकन खा, तंदुरुस्त रहा

Share This News

  • पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नाही

अफवा पसरवणारांवर होणार कडक कारवाई
नागपूर दि. 24 : कोरोनाकाळात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी व चिकन ही मोठ्या प्रमाणात प्रथिनांचे स्त्रोत आहेत. ती खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नसून, नागरिकांनी बिनधास्त अंडी- चिकन सेवन करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व मत्स्य विकास मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना केले.
विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशन व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चिकन फेस्टीव्हल’ प्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, संचालक विस्तार व शिक्षण डॉ. व्ही. डी. अहेर, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. सुधीर दुद्दलवार, विदर्भ पोल्ट्री फार्म असोसिशनचे अध्यक्ष राजा दुधबडे आदी उपस्थित होते.
पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, समाजमाध्यमांवर मात्र अफवा पसरविल्या जात आहेत. त्या या संसर्गापेक्षाही जास्त घातक आहेत. अफवा पसरवणा-या दोघांविरोधात सायबर शाखेकडे गुन्हा नोंदवून त्यांना उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. कुक्कुटपालन हा ग्रामीण भागात केला जाणारा व्यवसाय असून, अशा प्रकारांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसत आहे. आता हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अंडी व चिकन 100 ‍डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजवून खाण्यामुळे कोणतीही भीती राहत नाही, असे श्री. केदार यांनी स्पष्ट केले.
देशातील सर्वाधिक पोल्ट्रीची निर्यात ही महाराष्ट्रातून केली जाते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा आधार आहे.2006 नंतर देशातील कुक्कुटपालन क्षेत्र, व्यावसायिक व शेतकऱ्यांमध्ये कुक्कुटपालनाच्या व्यवस्थापनांत क्रांतिकारक बदल झाला आहे. पोल्ट्री फार्मवर जैविक सुरक्षा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण व कचऱ्याची विल्हेवाट अतिशय काटेकोरपणे होत असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव, तीव्रता आणि पक्ष्यांचे मृत्यू पावण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पूर्वी व आजही नोंद झालेल्या अनेक घटनांमध्ये वन्य, स्थलांतरीत, बिगर पाळीव इतर जातींचे पक्षी आणि काही घटनांमध्ये देशी गावरान कोंबड्यांमध्ये हा रोग आढळला आहे. व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधून उत्पादित होणाऱ्या व बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या अंडी व मांस उत्पादन करणाऱ्या पक्ष्यांमध्ये हा रोग सहसा दिसत नाही. फार्मवर रोग होऊ नये यासाठी शेतकरी, शासन व कुक्कुटपालन व्यवसायिक सर्व आवश्यक खबरदारी घेत असल्याचे श्री. केदार म्हणाले.
कोंबड्यांचे मांस व अंडी ही अतिशय उत्तम दर्जाची प्रथिने आहेत. शरीराला अनेक कार्याबरोबरच मुख्यत्वे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बर्ड फ्ल्यूमुळे आतापर्यंत एकही जीवितहानी झाली नाही. चिकन व अंडी खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पोल्ट्री फार्मवर उत्पादित होणा-या कोंबड्यांचा उत्पादकांनी विमा काढण्याचे आवाहन केले. नुकसान झालेल्या व्यावसायिकांना विमा राज्य व केंद्र शासनाकडून 90 रुपये प्रती पक्षी अशी मदत केली जाते, असे ते म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.