प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात
ठाणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कुठे घेऊन जात आहेत, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सरनाईक यांच्या इतर ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी किंवा अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यासाठी विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आज सकाळी 8 वाजता ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे मारले. सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारण्यात आले. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
प्रताप सरनाईक हे भारताबाहेर आहेत. ते ठाण्यात असते तर ईडीने त्यांनाच ताब्यात घेतलं असतं असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही. त्याऐवजी पुण्यातून एसआरपीएफचं एक पथक मागवलं होतं. या पथकात एकूण 40 जवान होते. हे जवान ठाण्यात येताच ईडीने एकाचवेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाड मारल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात शिवसेना आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला ईडीच्या धाडीची कुणकुण लागल्यास कारवाईत व्यत्यय येऊ शकला असता. त्यामुळेच ईडीने पूर्वतयारी करूनच ही कारवाई केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
ईडीने अचानक मारलेल्या या धाडीमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. सरनाईक हे आमदार असले तरी ते बांधकाम व्यवसायिक असल्याने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ईडीने धाड मारल्यानंतर आता पोलिसांनी सरनाईक यांच्या घरी धाव घेतली आहे.