कृषी तंत्रज्ञान सप्ताह सुरू होण्यासाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री

Share This News

पुणे
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकर्‍यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ सुरू होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

माती परीक्षण करून त्या-त्या भागातील मातीनुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्‍चितच मदत होईल, असे भुसे म्हणाले. शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थान, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि बायर कंपनी या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदाचा कृषिक २0२१ कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भुसे बोलत होते.

महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, शेतकर्‍यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांबरोबरच राज्यातील शेतमजुरांना विविध कौशल्यांची माहिती देऊन कौशल्यावर आधारीत कुशल शेतमजूर बनवण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.