पंतप्रधानांचा अहंकार की लाचारी?
देशातील शेतकरी आंदोलन आता एका टोकाला पोहोचले आहे. आम्ही कुणासमोरही झुकणार नाही, या पंतप्रधानांच्या मनातील अहंकारामुळे हे आंदोलन इतके लांबत चालले आहे. चीनसमोर
लोटांगण घालणा-या, त्यांनी भारताचा भूभाग ताब्यात घेतल्यानंतरही तोंडातून ब्र काढू न शकलेल्या पंतप्रधानांना आपल्याच देशवासियांची मागणी मान्य करणे म्हणजे कमीपणा वाटू लागला आहे.
दोन महिने कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करतोय. शेतकरी संघटनांच्या दाव्यानुसार आजवर १५० हून अधिक शेतकरी यात शहीद झाले आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफचे ४० जवान
शहीद झाले तर त्याचा राजकीय वापर करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकपर्यंतचे पाऊल उचलण्यात आले. पाकिस्तानला या साठी दोषी धरण्यात आले. मात्र आता दिल्लीच्या सीमेवर १५० शेतक-यांच्या मृत्यूच्या माध्यमातून ‘पुलवामा’ घडविणारेच शेतक-यांच्या नेत्यांवर, पत्रकारांवर गुन्हे दाखल करून या आंदोलनावरच सर्जिकल स्ट्राईक करीत आहेत. पंतप्रधानांना मोरासोबत छायाचित्रे
काढायला वेळ आहे, मात्र शेतक-यांशी चर्चा करायला वेळ नाही,
हे बघून देशाला एक मोठा धक्काच बसला आहे. शेतक-यांच्या मृत्यूस केंद्रातील सरकार आणि या सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान हे जबाबदार आहेत. देशाचे पंतप्रधान शेतक-यांना जाऊन भेटत नसताना, त्यांच्याशी थेट चर्चा करीत नसताना त्यांना कोणताही प्रश्न विचारण्याऐवजी त्यांची पाळीव माध्यमे आणि पत्रकार शेतक-यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभी करण्याची देशद्रोही कृती करीत
आहेत. पंतप्रधान नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत की त्यांना शेतक-यांशी थेट संवाद साधायला वेळ नाही? हिंसेला चिथावणी देणे, त्यासाठी प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकारासाठी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतक-यांच्या एका गटाला आपल्या असंवेदनशीलतेने हिंसा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मोदी सरकार आणि पंतप्रधान यांच्यावर खरेतर गुन्हे दाखल करायला हवेत. मात्र या उलट शेतकरी नेत्यांना, या आंदोलनाचे सत्य जगापर्यंत पोहोचविणा-या पत्रकारांना लक्ष्य केले जातेय. ही एकप्रकारे आणिबाणीची स्थिती मोदी सरकारने निर्माण केली आहे. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील एक-दोन गट आक्रमक झाले. त्यांनी लाल किल्ल्यावर पोहोचून निदर्शने केली. शीख धर्मासाठी वंदनीय असलेला निशान साहिब हा ध्वज त्यांनी लाल किल्ल्यावर फडकावला. ही कृती करणारे दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि भाजप खासदार सन्नी देओल यांचे ते निवडणूक प्रतिनिधी होते, हे सत्य नंतर बाहेर आले. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार आणि भाजपनेच ही खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले आहे.
.