एकनाथ शिंदे यांनी घेतला पार्किंग प्लाझा, आणि व्होल्टास कंपनी मधील कोविड केअर सेन्टरच्या कामांचा आढावा

Share This News

ठाणे, २१ एप्रिल : – शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडस कमी पडत आहेत. अशात शहरातील पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास कंपनी मधील कोव्हिड केअर सेंटर्स लवकरात लवकर सूरु करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही कोव्हिड केअर सेंटर मधील कामाचा आढावा घेतला. ही कोविड केअर सेंटर्स कार्यान्वित करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
 ज्युपिटर हॉस्पिटल जवळील पार्किंग प्लाझा कोव्हिड केअर सेंटरची 200 आयसीयू बेडस आणि 800 ऑक्सिजन बेडस अशी सुमारे 1000 रुग्णांना सेवा देण्याची क्षमता आहे. हे कोविड केअर सेन्टर मर्यादित स्वरूपात कार्यान्वित असून आजमितीस या सेंटरवर 375 सौम्य लक्षण असलेले पेशंट्स उपचार घेत आहेत. याशिवाय आयसीयू वार्डची कामे कुठवर पूर्ण झालेली आहेत याचा या भेटीत श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. त्याचप्रमाणे व्होल्टास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या 1000 बेडसच्या कोविड केअर सेंटरच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. हे कोविड केअर सेंटरचा अद्याप वापर सूरु झालेला नसला तरीही केलेल्या कामाबाबत त्यांनी काही महत्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरच्या मागच्या बाजूस ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारल्या जात असलेल्या ऑक्सिजन जनरेशन आणि डिस्ट्रिब्युशन प्लांटला आज श्री. शिंदे यांनी भेट दिली.
 आयरॉक्स कंपनीमार्फत हा प्लांट उभारला जात असून या प्लांट मधून दररोज 47 लिटरचा एक जम्बो सिलेंडर यानुसार 175 जम्बो सिलेंडर रिफिल करून पुरवठा करण्याची क्षमता आहे. या प्लांट मधून तयार केलेला ऑक्सिजन या कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना वापरता येणार आहे. हे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. तसेच या प्लांटची क्षमता दुप्पट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. हा प्लांट सुरू झाल्यास कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सूरु करण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकेल. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.