फ्रान्समध्येही शेतकऱ्यांच एल्गार|Elgar of farmers in France too

Share This News

पॅरिस : नव्या कृषी कायद्याविरोधात आणि हमी भावाच्या कायद्यासाठी भारतात मागील १00 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना फ्रान्समध्येही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागील एक महिन्यांपासून अनेक शेतकरी संघटनांनी देशातील विविध भागात सरकारविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. देशभरातील सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेरही शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
राजधानी पॅरिसमध्ये शेतकर्‍यांनी झाडांवर पुतळे लटकवून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना र्शद्धांजली वाहिली. देशात वाढत असलेली आर्थिक असमानता, शेतकर्‍यांचे कमी होणारे उत्पन्न, शेतमालाच्या दरात झालेली घट आदी मुद्यांवर सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. फ्रान्समधील शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही.
मोठे सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्रांमुळे शेतमालाचे दर पडत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. फ्रान्समधील कृषी संकटामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची शेतमाल खरेदी करणार्‍या मोठ्या होलसेलर्ससोबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या चर्चेत फ्रान्स सरकारचे प्रतिनिधीदेखील सहभागी आहेत. मात्र, मागील एक महिन्यापासून या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही.
फ्रान्समधील इमॅन्युएल मॅक्रॉनच्या सरकारने २0१९ मध्ये एक कृषी कायदा संमत केला होता. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळून त्यांना चांगला फायदा मिळावा यासाठी हा कायदा करण्यात आला होता. मात्र, या कायद्यानंतरही शेतकर्‍यांना चांगला दर मिळत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकर्‍यांनी म्हटले की, उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळत नाही. तर, सुपरमार्केट्सच्या मालकांनी सांगितले की, शेतकर्‍यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी ग्राहकांवर भार टाकू शकत नाही.
भारतातही राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी शंभर दिवस पूर्ण झाले. नवीन कृषी कायदे मागे घ्या, शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी कायदा तयार करा आदी मागण्या शेतकरी संघटनांनी केल्या आहेत. देशभरातही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलने करण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.