पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील विविध विकासकामांची पाहणी

Share This News

मानखुर्द उड्डाणपूल, मियावाकी पद्धतीचे वनीकरण, कांदळवन येथील पाहणी व आढावा

मुंबई, दि. 4 : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी चेंबूर व मानखुर्द येथील विविध ठिकाणांच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला.

            या पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीस पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी मानखुर्द फ्लायओव्हरच्या कामाची पाहणी केली व तेथील कामाचा आढावा घेतला. हा ब्रीज एकूण २.९ किमी लांबीचा आहे. त्यातील २.५ किमी लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित ४०० मीटरचे काम देखील पूर्ण होत आले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द दरम्यान देवनार डंपिंग जंक्शन असल्याने तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मुंबईबाहेर जाण्यासाठी किंवा नवी मुंबईकडे जाण्यासाठी हा महत्वपूर्ण रस्ता असल्याने येथे रहदारी असते. या परिस्थितीतही मुंबई महानगरपालिकेने उड्डाणपुलाचे काम वेगात करून पुर्णत्वापर्यंत आणले आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणीवेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, मुख्य अभियंते राजन तळकर, उपायुक्त अनंत कदम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी चेंबूर येथील भक्ती पार्क येथील मियावाकी पद्धतीने लागवड केलेल्या वनीकरणाची पाहणी केली. गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत श्री. आदित्य ठाकरे यांनी भक्ती पार्कमध्ये मुंबई महापालिकेचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणास सुरुवात केली होती. त्यावेळी २१ हजार वृक्षांची लागवड केली होती. आता तेथे ५७ हजार वृक्षांची लागवड झाली आहे. येत्या दोन महिन्यात आणखीन १२ हजार वृक्षांची लागवड तेथे केली जाणार असून या वर्षाच्या अखेरपर्यंत मुंबईत मियावाकी पद्धतीने कमीतकमी तीन लाख झाडे लावण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. यासंदर्भात पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जंगलांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे, पण अशा पद्धतीने शहरांमध्ये जंगल निर्माण करून पर्यावरण संवर्धन हा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात राज्यात इतर शहरांमध्येदेखील मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करून शहरी जंगल निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

             पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी माहूल नाला येथील कांदळवन परिसर येथे स्थळपहाणी केली. मँग्रोव्ह सेलच्या उपवनसंरक्षक सोमराज निनू यांच्यासोबत चर्चेनंतर कांदळवनांवर होणाऱ्या डंपींगबाबत तत्काळ कठोर कारवाईचे आदेश श्री.ठाकरे यांनी दिले. आमदार प्रकाश फातर्पेकर, नगरसेवक श्रीकांत शेट्टी यावेळी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.