हिंगणघाटच्या जळीतकांडात साक्ष नोंदणी सुरू

Share This News

वर्धा : हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांडातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या घटनेच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम सोमवार, १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी न्यायालयासमख प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदवून घेतला.
प्रत्यक्षदर्शीने न्यायालयाला सांगितले की, आरोपीने अंकिताला शरीरावर पेट्रोल टाकून कसे पेटवून दिले. यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अॅड. निकम म्हणाले की, साक्षी-पुरावे नोंदणीचे काम आता न्यायालयात सुरू झाले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालत आहे. १६ व १७ फेब्रुवारीलाही खटल्याचे कामकाज चालणार आहे. खटल्याचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम नागपुरात दाखल झालेत. त्यानंतर हिंगणघाट येथे येण्यापूर्वी त्यांनी खटल्याची बारकाईने माहिती घेतली. सोमवारी सुनावणीच्या पहिल्या दिवशी तब्बल अडीच तास साक्षी-पुरावे नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले. आरोपीच्या वकिलांनी ओळखपरेडदरम्यान महत्वाची साक्ष ठरलेल्या नायब तहसीलदार विजय पवार यांची साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाल्याचे सांगितले.

काय आहे घटना
प्राध्यापक असलेल्या अंकिताला जिवंत जाळण्याचा प्रकार ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी हिंगणघाटातील नंदोरी चौकात घडला होता. ४० टक्के भाजलेल्या अंकितावर उपचार सुरू होते. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. उपचारासाठी अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. अंकिताच्या मृत्यूनंतर गावकरी संतप्त झालेत व त्यांनी आंदोलन केले होते. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात घेण्यात येईल असे त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले होते.

घटनाक्रम

  • सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने प्राध्यापिका एसटी बसमधून नंदोरी चौकात उतरली.
  • सकाळी 7 वाजून 7 मिनिटं – प्राध्यापिका महाविद्यालयाकडे हळूहळू पायी जाण्यास निघाली. त्याच वेळी एसटीच्या मागून दुचाकीने आलेला आरोपी विकेश नंदोरी चौकाजवळ थांबला.
  • सकाळी 7 वाजून 10 मिनिटं – गाडीतून पेट्रोल काढून. पेट्रोलने टेंभा भिजवला, नंतर तो प्राध्यापिकेच्या मागे पायीपायी गेला.
  • सकाळी 7 वाजून 15 मिनिटे – प्राध्यापिका चालत चालत न्यू महालक्ष्मी किराणा धान्य भांडारापर्यंत पोहचली. तेव्हा आरोपी विकेश नगराळे याने वेगाने चालत जात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकले.
  • सकाळी 7 वाजून 17 मिनिटे – पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोलने भिजवलेला पेटता टेंभा फेकून तो दुचाकीकडे पळाला.
  • सकाळी 7 वाजून 20 मिनिटे- हल्ल्या करण्याआधीच त्याने दुचाकी सुरू ठेवलेली होती. त्यावरून तो पळाला.
  • हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यात आरोपी विकेशला पकडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला पण तो हाती आला नाही.
  • सकाळी 7 वाजून 20 मिनिटे – पीडितेला कारने शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.