खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर मावस बहिणीचा विनयभंग;

Share This News

पिंपरीतील घटना  बलात्कार करुन मुलींना रात्रभर स्टेशन परिसरात बसवले.

पिंपरीतील खळबळजनक घटना; पाच युवकांना अटक

पिंपरी : ओळखीचा फायदा घेत एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तर, सोबत असलेल्या मित्राने मावस बहिणीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना अजंठानगर येथे घडली. त्यानंतर आरोपींनी तिघा मित्रांना बोलावून पीडित मुलींना चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी (दि. १५) रात्रभर बसविल्याचे समोर आले आहे. करण भैरवनाथ साबळे (वय २१, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर चिंचवड), आशिष आनंद सरोदे (वय २०, रा. पत्राशेड, पीसीएमसी शाळेजवळ, अजंठानगर), निवास संजय सुतार (वय २०, रा. सी. पत्राशेड, अजंठानगर), तेजस राजू वाघमारे (वय १९, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय २१, रा. डी. पत्राशेड, अजंठानगर) यांना निगडी पोलिसांनीबलात्काराच्या आरोपावरुन अटक केली. न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिडित अल्पवयीन मुलींनी फिर्याद दिली आहे. पीडित मुली मंगळवारी रात्री (दि. १५) नातेवाईकाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना त्यांना ओळखीचे करण आणि आशिष भेटले. त्यांनी जवळच भटकंती करु असे सांगून अजंठानगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे आशिषने एका मुलीवर बलात्कार केला. तर, करणने तिच्या मावस बहिणीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. पीडित मुलींना मोटारकारमध्ये बसवून चिंचवड स्टेशन परिसरात रात्रभर बसविले. बुधवारी सकाळी पीडित मुलींना सोडल्यानंतर ही घटना उजेडात आली. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ म्हणाले, आरोपींची पीडितेशी ओळख होती. त्याचा फायदा घेत आशिषने एका मुलीवर बलात्कार केला. तर, करणने दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर सर्व आरोपींनी पीडितेला रात्रभर चिंचवड स्टेशन परिसरात थांबवून ठेवत सकाळी सोडून दिले. सामुहिक बलात्कार झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दोनही मुलींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरु आहे. त्यातून नेमकी माहिती हाती येईल. तसेच, आरोपींवर या पुर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.