नागपूर : थकीत पाणी कर अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुदतवाढ
नागपूर
थकीत पाणी कर भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपाचे स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा करून ३१ जानेवारी २0२१ पयर्ंत पाणी कर १00 टक्के शास्ती माफीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयामुळे निर्धारित कालावधीमध्ये पाणी कर न भरू शकणार्या नागरिकांनी आपले थकीत पाणी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
जलप्रदाय विभागाच्या अभय योजनेअंतर्गत सुरुवातीला २१ डिसेंबर २0२0 ते २१ जानेवारी २0२१ पर्यंत थकीत पाणीबिल धारकांनी बिल भरणा केल्यास त्यांना १00 टक्के शास्ती माफ केली जाणार होती. त्यास आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यानंतर १ ते २२ फेब्रुवारी २0२१ पर्यंत ७0 टक्के शास्ती माफ करण्यात येईल. थकीत पाणीबिल धारकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपले पाणीबिल भरून थकबाकीदारांच्या यादीतून आपले नाव कमी करावे, असे आवाहन जलप्रदाय समिती सभापती व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केले.
कोविड-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये नागरिकांना सहन कराव्या लागणार्या अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणी कर संदर्भात अभय योजना लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर व थकीत पाणी कर भरून आपली पाटी कोरी करावी, असेही आवाहन त्यांनी केले.