जादा शुल्क आकारले, अमरावतीच्या दोन रुग्णालयांना नोटीस | Extra charges levied, notice to two hospitals in Amravati

Share This News

अमरावती : कोरोना उपचार व तपासणीसाठी शासनाने निश्चित दर आकारून दिलेले असतानाही रुग्णांकडून जादा दर आकारणाऱ्या बारब्दे हॉस्पिटल, न्यू अंबिके डायग्नोस्टिक सेंटर व सिटी हॉस्पिटल या तीन रूग्णालयांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:ही काही रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली. पथकातर्फे केलेल्या तपासणीनुसार उपजिल्हाधिकारी राम लंके व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप यांनी सादर केलेल्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस जारी केल्या आहेत. तपासणीनुसार, बारब्दे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये शासनाच्या दर परिपत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून आले. सर्वसाधारण वॉर्ड, अतिदक्षता वॉर्ड असा भेद न करता रुग्णांकडून सरसकट प्रतिदिन ९ हजार रूपये दर आकारण्यात आला. शासकीय दरफलकाचा फलकदेखील तिथे लावलेला नव्हता. न्यू अंबिके रेडिओ डायग्नोस्टिक अॅण्ड फिजिओथेरपी सेंटरमध्ये सर्व रूग्णांना सरसकट अडीच हजार रूपये दर आकारण्यात आले. वास्तविक शासन निर्णयानुसार हा केवळ दोन हजार रूपये आकारणे आवश्यक होते. तिथेही शासकीय दरपत्रक लावले नव्हते. पावती पुस्तकात अडीच हजार व रजिस्टरमध्ये दोन हजार असे वेगवेगळे दर नोंदविल्याचे दिसून आले. ‘न्यू अंबिके’ने तर पावतीपुस्तकात चांगला कार्बनदेखील वापरला नाही. त्यामुळे अनेक नोंदी अस्पष्ट होत्या व त्या तपासता आल्या नाहीत. सिटी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये नोंदणी, तपासणी, एक्स-रे आदी दर शासन दरानुसार आकारले जात नसल्याचे दिसून आले. तिथेही वॉर्डचा सर्वसाधारण, अतिदक्षता असा भेद न करता रुग्णांकडून सरसकट प्रतिदिन ९ हजार रूपये दर आकारण्यात आला. दरफलक सिटी हॉस्पिटलमध्येही लावलेला नव्हता. बारब्दे हॉस्पिटल, न्यू अंबिके डायग्नोस्टिक सेंटर व सिटी हॉस्पिटलने ज्या रुग्णांकडून जादा दर आकारले आहेत, ती रक्कम त्या रुग्णांच्या खात्यात जमा करण्यासाठी रेखांकित धनादेशाद्वारे परत करण्याचे व्हावेत व या तिन्ही रुग्णालय, केंद्राची महापालिकेच्या अंकेक्षण पथकाद्वारे तपशीलवार तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे, रूग्णनिहाय जादा आकारणीच्या रकमेचे संकलन करून ही रक्कम रुग्णांना परत केली किंवा कसे, याचीही पडताळणी व्हावी, ही शिफारस पथकाने केली. त्यावरून या तिघांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे. महावीर हॉस्पिटलमध्येही शासकीय दरपत्रकाचा फलक दर्शनी भागावर लावलेला नव्हता. एक्झॉन हॉस्पिटल येथे सीबीसीचे दर स्वतंत्रपणे आकारल्याचे आढळले. त्याबाबतही कार्यवाही केली जात आहे. शहरातील बख्तार व बेस्ट हॉस्पिटलमध्ये कामकाज नियमानुसार चालत असल्याचे पथकाला आढळले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.