पोस्ट कोविड रुग्णांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या

Share This News

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडदेखील मिळत नाही. औषधांचाही तुटवडा आहे. त्यातच आता कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना अन्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे पुढे आले. यामध्ये अनेक रुग्णांना डोळ्यांच्या समस्या जाणवत असल्याचे दिसून आले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टीदेखील जाऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णांना तर ऑक्सिजन सिलेंडरसह घरी पाठविले जात आहे. यामध्ये काही रुग्णांना डोळ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याला ब्रॉन्च रेटिनल वेन ऑक्लूशन (बीआरव्हीओ), सेंट्रल वेन ऑक्लुशन (सीआरव्हीओ) आणि एंटिरियर इशेमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी (एआयओएन) बिमारी म्हटले जाते. यात डोळ्याचे दुखणे, डोळ्यांची खाज अशा समस्या निर्माण होते. एआयओएनमध्ये तर डोळे उघडल्यानंतर बराच वेळ डोळ्यासमोर अंधारी राहते. काही वेळानंतर दिसणे सुरू होते. प्रारंभी ही समस्या काही वेळापुरती असते. मात्र, कालांतराने याचा अवधी वाढत जातो. यात दृष्टीही जाऊ शकते. कोविड रुग्णांना डायबिटीज आणि हायपरटेंशनची समस्या असल्यास हा त्रास जाणवण्याचा धोका अधिक असतो. डायबिटीज रुग्णांना कोविडनंतर थ्रोंबोसिस अधिक होत असल्याचे सांगितले जाते. थ्रोबोसिसमध्ये ब्लड क्लॉटिंग अधिक होते. हे डोळ्यांच्या नसांमध्ये देखील होते. यामुळे डोळ्यांच्या नस ब्लॉक होण्याचा धोका अधिक असतो. नेत्ररोगतज्ज्ञ विजय अंबाडे यांनी सांगितले की, या प्रकारातील रुग्ण वर्षभरात एक किंवा दोन येतात. मात्र, मागील दोन महिन्यात बीआरव्हीओ आणि सीआरव्हीओचे जवळपास ४ ते ५ रुग्ण आले आहेत. एआयओएनचे चार रुग्ण आले आहे. यात डोळे निकामी होण्याचा धोका अधिक आहे. या सर्व रुग्णांना डायबिटीज होता. तर एक दोन रुग्णांना डायबिटीजसह हायपरटेंशनचाही त्रास होता, असे त्यांनी सांगितले. कोविडनंतर अशाप्रकारचा त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोविडमधून बरे झाल्यानंतर एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. यामुळे योग्य निदान होईल. काही समस्या असल्यास वेळीच उपचार करता येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.