देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला नागपूरच्या रस्ते विषयक विकास कार्यावर आनंद
नागपूर , 25 जानेवारी नागपुरात रस्ते विषयक झालेल्या विविध विकास कार्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. सामाजिक माध्यमांद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” रविवारी केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत नागपुरात दोन कामांचे उदघाटन आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत केले. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पहिला कार्यक्रम हिंगणा टी-पॉईंट ते छत्रपती चौक येथील अंतर्गत वळण रस्त्याच्या सुधारणा कामाच्या उदघाटनाचा झाला. दुसरे उदघाटन सुयोगनगर ते मानेवाडा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे झाले.
नागपूरकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे की, रिंगरोडचे लोकार्पण नागपूरकरांसाठी झाले आहे. पुढच्या 50 वर्षांची सोय या रस्त्यांनी झाली आहे. गेल्या 5 वर्षांत अनेक कामे नागपूर शहरासाठी झाली. अनेक रस्ते, राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था, मेट्रोचे डबलडेकर पूल, फुटाळा सौदर्यींकरणाचा प्रकल्प लवकरच पूर्ण होतो आहे. असंख्य कामे झाली आहेत आणि अनेक कामे पूर्णत्त्वाच्या टप्प्यात आहेत. नागपूरकरांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.”
नागपूर शहरातील अंतर्गत वळण रस्ता छत्रपती चौक ते मानकापूर जंक्शन या सहा पदरी रस्त्याचे उदघाटन केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. एकूण २०५ कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पात २१ किमी लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे. या सहा पदरी रस्त्यालगत झाडे लावून हा हरितमार्ग करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. एनएचएआय’मार्फतही शहरात विविध विकासकामे करण्यात आली असून अनेक प्रकल्प निर्मिती प्रक्रियेत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले .