फडणवीस यांनी पत्रपरिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टाकला‘डेटा बाॅम्ब’

Share This News

मुंबई- विरोधक एका पाठोपाठ एक सरकारची प्रकरणे उकरून काढत आहेत. तर सरकार या प्रत्येक प्रकरणात तोंडघशी पडताना दिसत आहे. आता आणखी एका प्रकरणात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर ‘डेटा बाॅम्ब’ टाकला आहे.

तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्फत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा एक अहवाल बनवण्यात आला होता. हा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 8 ऑगस्ट 2020 मध्ये दिला होता. परंतू त्यांनी या अहवालाकडे दुर्लक्ष केलं. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मी आज राज्याच्या गृहसचिवांना भेटणार असल्याचं फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

परमबीर सिंग अशा प्रकारची तक्रार करणारे पहिलेच व्यक्ती नाहीत. सुबोध कुमार जयस्वाल यांनीही मुख्यमंत्र्याना एक अहवाल दिला होता. या रिपोर्टमध्ये 6.3 जीबीचा डाटा असून यात पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा मोठा खुलासा केला गेला आहे, असं फडणवीस म्हणाले. या प्रकरणात गृहमंत्र्यालयातील लोकांचा समावेश आहे. तर या सर्व काॅल रेकाॅर्डस संवेदनशील असून मीडियाला देण्यासारख्या नाहीत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, या सर्व प्रकरणाचा रिपोर्ट घेऊन दिल्लीला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. हा डाटा ते गृहसचिवांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. तर दुसरीकडे हा सरकारी डाटा फडणवीस यांच्याकडे कसा आला? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.