फडणवीसांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, टीका मात्र ठाकरे सरकारवर
मुंबईमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुखविरोधी पक्ष असणारा भाजपा पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं चित्र पहायाला मिळत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन दिल्ली मेट्रोमधील प्रवासाचे काही फोटो ट्विट केले. यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रो कधी पूर्ण होईल असा प्रश्नही उपस्थित केला. या प्रश्नाला काँग्रेसने उत्तर दिलं आहे.
झालं असं की देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. त्यांनी दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. या प्रवासातील काही फोटो त्यांनी आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवरुन शेअर केले. “मी आज दिल्ली विमानतळावर येण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. रस्ते मार्गाने प्रवास करताना लागणाऱ्या वेळेपेक्षा खूपच कमी वेळ मला या प्रवासात लागला. मात्र महाविकास आघाडी सरकारने कारशेड्या विषयावरुन घातलेला गोंधळ आणि निर्माण केलेल्या गुंतागुंतीमुळे मी मुंबईतील मेट्रो थ्रीमधून विमानतळापर्यंत कधी प्रवास करु शकेन ठाऊक नाही,” असा टोला फडणवीस यांनी हे फोटो शेअर करताना लगावला.