अन्वय नाईक प्रकरणावरून फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग

Share This News

मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या विधानानंतर माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंग दाखल केला आहे. बुधवार, १० मार्चला विधान सभेच्या कामकाजादरम्यान दुपारी सव्वा बाराच्या सुमारास फडणवीस यांनी हा प्रस्ताव दाखल केला. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील विधान सभेत उपस्थित होते.
अन्वय नाईक प्ररकणावरून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हे माहिती असतानाही गृहमंत्री देशमुख यांनी विधिमंडळात खोटे विधान केले. एकदा नव्हे तर दोनदा आपले नाव घेतले. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर तर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे, शिवाय सभागृहाचीही दिशाभूल केली आहे असे प्रस्ताव दाखल करताना फडणवीस म्हणाले. कायद्यातील विविध तरतुदींचे वाचन करीत त्यांनी विधान सभेच्या तालिका अध्यक्षकांना हा विशेषाधिकार भंग कसा ठरू शकतो हे स्पष्ट केले. सचिन वाझे प्ररकणाची चर्चा सुरू असताना त्यांनी अन्वय नाईकच्या मुद्द्यावरून आपले व्यक्तीश: नाव घेतले. आपण चुकीचे बोलतोय हे माहिती असतानाही गृहमंत्री सभागृहात व बाहेरही या मुद्द्यावर बोलत राहिल्याने त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे सिद्ध होत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव दाखल केला. तालिका अध्यक्षकांनी प्रस्ताव तपासून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर फडणवीस शांत झालेत.

चव्हाणांवरही हक्कभंग
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात बोलताना अशोक चव्हाण यांनीही खोटी विधाने केली. त्यामुळे त्यांच्या विरोधातही हक्कभंग दाखल करणार आहे. त्याची सूचना अध्यक्षांना पाठवित असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहात खळबळ उडाली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.