अखेर शेतकर्यांचा दिल्लीत प्रवेश
कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकर्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळाली. शुक्रवारी पोलिस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकर्यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास आंदोलकांना मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांची नजर शेतकर्यांवर कायम राहणार आहे.
आंदोलक शेतकर्यांकडून दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली जात होती. जवळपास ५ लाख आंदोलकांचा यात सहभाग असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले. अशात दिल्लीत दाखल झाल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला होता.
आपण कोरोनाच्या गाईडलाईन्सहीत इतर नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचेही शेतकर्यांनी आश्वासन दिले. निरंकारी मैदानातही मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतकर्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे.