उद्योगपतींना जाब विचारण्यासाठी अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा जनता दलाचाही सहभाग
मुंबई, दि. १९ : अंबानी-अदानींसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच मोदी सरकार काम करीत असून त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सूचना करूनही सरकारने वादग्रस्त शेती कायद्यांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उद्योगपतींनाच जाब विचारण्याच्या हेतूने २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील मुकेश अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात येणार असून जनता दल सेक्युलर पक्षही त्यात सहभागी होणार आहे.
गेले तीन आठवड्याहून अधिक काळ दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी रस्त्यावर आपल्या मागण्या घेऊन बसले आहेत. वृद्ध , महिला आणि लहान मुले सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली आहेत. या तीन आठवड्यात वेगवेगळ्या कारणांनी जवळपास 30 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनात होणारे शेतकऱ्यांचे हाल , महिला किंवा लहान मुलांच्या हालअपेष्टा आणि सत्ताधारांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी हेटाळणी पाहून शीख धर्मगुरू संत बाबा रामसिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली आहे. परंतु मोदी सरकारला मात्र शेतकऱ्यांची दया आलेली नाही.
उलटपक्षी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलनाला जातीय रंग देण्याचा, पाकिस्तानी – चिनी किंवा खलिस्थानी ठरवून शेतकऱ्याला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि परिवारातील संघटनांकडून सुरू आहे.
सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊन पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देताना पकडण्यात आले आहेत. यातून सत्ताधाऱ्याचे डावपेच आणि हेतू स्पष्ट होत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त शेती कायद्यांना स्थगिती देण्याची केलेली सूचनाही सरकारने मान्य केलेली नाही.
अंबानी आणि अदानी सारख्या मोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी, संपूर्ण शेती व्यवसाय त्यांच्या घशात घालण्यासाठीच सरकारने वादग्रस्त कायदे मंजूर केले आहेत. हे कायदे मंजूर होण्या आधीच अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींनी शेतमाल साठविण्याची प्रचंड क्षमता असलेली गोदामे बांधून ठेवली आहेत, हे त्याचेच द्योतक आहे.
देशातील सर्व साधनसामुग्री, संपत्ती, उद्योगधंदे आणि शेती हे मुठभर उद्योगपतींच्या स्वाधीन करून त्यांच्या माध्यमातून जनतेवर नियंत्रण ठेवण्याच्या अश्लाघ्य हेतूने भाजप सरकार आणि संघ परिवाराची पावले पडत आहेत, असा आरोप जनता दलाचे राष्ट्रीय महासचिव न्या. बी. जी. कोळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे, उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो, डॉ पी. डी. जोशी पाटोदेकर, महासचिव अझमल खान, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी केला आहे.
अंबानी-अदानी सारखे उद्योगपतीच या सरकारचे प्राण आहेत. त्यामुळेच या उद्योगपतींनाच एकप्रकारे तुमची हाव तरी किती आहे, असा जाब विचारण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून 22 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अंबानींच्या मुंबई येथील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्ष, शेकाप, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष यांच्या बरोबरच जनता दल तसेच अन्य पक्ष संघटना या मोर्चात सहभागी होणार अाहेत. मुंबई स्थित नोकरदारांनीही, आपल्या अन्नदात्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरीपुत्र या नात्याने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे उद्या रविवारी २० डिसेंबर रोजी राज्यातील प्रत्येक गावात पणत्या, मेणबत्त्या वा दिवे लावून दिल्लीतील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्याचे आवाहनही माजी खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे तसेच जनता दलाच्या वतीने करण्यात आले आहे.