महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला; चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड कडाडला!

Share This News

पालघर: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापलं आहे.

गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केलं. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. त्यामुळे या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केलं.

पालमघरमध्ये माकपचं आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेला. या मोर्चात शेतकरी कुटुंबकबिल्यासह उपस्थित झाले होते. यावेळी कृषी विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, या संतप्त आंदोलकांना तहसील कार्यालयाच्या गेटवरच रोखण्यात आलं. त्यामुळे आंदोलकांनी तहसीलच्या गेटवर बसूनच जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, पालघरमध्येच काँग्रेस, कष्टकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन केलं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.