साई’च्या जागेवरील अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करा : महापौर दयाशंकर तिवारी
शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरनाला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर दिली आहे. मात्र या प्रस्तावित जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
‘साई’च्या कामाबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घेउन कार्यवाही करण्यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त, एनएमआरडीचे सभापती, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविण्याचे निर्देश दिले. बैठकीला उपस्थित आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की , नागपूर शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करणे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. तसेच हा प्रकल्प केंद्र सरकारचा असून या प्रकल्पाशी राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही. गेल्या काही वर्षात अनेक लोकांनी अवैधरित्या या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली. आता अतिक्रमणधारकांची संख्या आणखी वाढली आहे. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून संयुक्त कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.