मेडिट्रिनाच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Share This News

नागपूर : रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये बिल घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी संचालक व मुख्य व्यवस्थापक डॉ. समीर नारायण पालतेवार (वय ५०, रा. प्रेस्टिज अपार्टमेंट, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आयकर सल्लागार व मेडिट्रिनाचे संचालक गणेश रामचंद्र चक्करवार (वय ६१, रा. शुभम रिजन्सी, रामदासपेठ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वीही पालतेवारांविरुद्ध जीवनदायी योजनेअंतर्गत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१९ ते १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत भंडारा येथील विवेकानंद हटवार, भद्रावती येथील पुरुषोत्तम खापर्डे व रामटेक येथील वसंत डाबरे यांच्यावर मेडिट्रिनात उपचार करण्यात आले. हटवार यांना २ लाख ८६ हजार, खापर्डे यांना २ लाख ९९ हजार तर डाबरे यांना ३ लाख ६३ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. पालतेवार यांनी हॉस्पिटलच्या कम्प्युटरमध्ये मात्र अनुक्रमे ७३ हजार ६००, २ लाख व १ लाख ३७ हजार रुपये मिळाल्याची नोंद केली. याबाबत चक्करवार यांना माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केली असता हा घोटाळा उघडकीस आला. चक्करवार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मसाळ, पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी चौकशी केली. घोटाळा झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर शनिवारी पालतेवार व अन्य आरोपींविरुद्ध फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.