प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक नारानीपुझा शनावास काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक नारानीपुझा शनावास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी नारानीपुझा शनावास यांनी अखेरचा श्वास घेतला. नारानीपुझा हे ‘गांधीराजन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नारानीपुझा यांना कोची येथील अॅस्टर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनावास यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने सोशल मीडियावर पोस्ट करत नारानीपुझा शनावास यांना श्रद्धांजली वाहिली.चित्रपटातील कथेप्रमाणेच तुमचा स्वभाव प्रेमळ आणि संवेदनशील होता. तुमच्या सुफी आत्म्याला सुंदर सुफियम सुजातायमसारखी जागा मिळो, अशी पोस्ट करत अदिती राव हैदरीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. नारानीपुझा शानावास हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक व लेखक होते. जुलैमध्ये त्यांचा ‘सुफियम सुजातायम’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आदित्य राव हैदरी, जयसूर्या आणि देव मोहन झळकले होते.