अखेर खासगी विमानाने गेले राज्यपाल
मसुरी येथील आएएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जाण्यासाठी सुमारे 8 दिवसांपूर्वी परवानगी मागूनही महाराष्ट्र सरकारने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी नाकारली. त्यामुळे राज्यपालांनी गुरुवारी दुपारी 12.15 वाजता खासगी विमानाने मसुरीला प्रयाण केले. उत्ताराखंडमधील मसुरी येथील आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निमंत्रण मिळाले होते. त्यानुसार सुमारे एक आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रवासाची परवानगी मागितली होती. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांना प्रवासाची परवानगी दिली नाही. त्यामुळे ऐनवेळी राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरून ऱाजभवनात परतण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर राज्यपालांनी दुपारी 12.15 वाजता डेहराडून स्पाईस जेटच्या खासगी विमानाने मसुरीला प्रयाण केले. या प्रकारावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून राज्यसरकारवर टीका केली जातेय. दरम्यान राज्यातील विरोधकांनी हा सर्व प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे.
इतिहासातील सर्वा अहंकारी सरकार – फडणवीस याबाबत फडणवीस म्हणाले की, राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात. राज्यपालांना कुठे जायचे असेल तर ते जीएडीला पत्र लिहितात, ते त्याबाबत ऑर्डर काढतात. मी माहिती काढली, कालच जीएडीला परवानगी दिली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचले. पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके अहंकारी सरकार पाहिले नव्हते. कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे, असे सांगत फडणवीस यांनी घटनेवर खेद व्यक्त केला.
राज्यपालांची क्षमा मागावी-मुनगंटीवार राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. राज्य सरकारने राज्यपालांची क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडले असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मंत्रालयात जाऊन माहिती घेतो- उपमुख्यमंत्री यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती. प्रसिद्धी माध्यमांशी बोलल्यानंतर या प्रकाराची कल्पना आली. याबाबत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांकडून काय घडले याची माहिती घेऊ त्यानंतर याबाबत बोलता येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला- दरेकर राज्यात सूडभावनेचा अतिरेक झालाय. एव्हढे सूडभावनेने वागणारे सरकार आजपर्यंत पाहिले नाही. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याची गरिमा राखली पाहिजे. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.