नागपुरात कोविड रुग्णालयाला आग; महिलेसह 4 रुग्ण दगावले

Share This News

नागपूर
नागपूर शहरालगतच्या वाडी येथील वेलट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागली. या आगीत चार रुग्णांचा (तीन पुरुष, एक महिला) मृत्यू झाला. यापैकी तिघांचा आगीदरम्यान तर एकाचा आग लागण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.तर ११ ते १२ रुग्ण जखमी असून, त्यांना उपचारासाठी नागपुरातील मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली होती.
वेलट्रीट मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयातील आयसीयूमधील एसीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास घडली. काही क्षणातच धुराचे लोळ बाहेर पडायला लागले. कर्मचार्‍यांनी तैनात परिचारिका व हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉ. राहुल ठवरे यांना सांगितली. तत्काळ घटनेची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. तातडीने कर्मचार्‍यांनी आयसीयू गाठून भरती रुग्णांना इतरत्र हलविले. एकूण २८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. घटनेची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचीही चर्चा आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला प्रमुख अग्निशमन अधिकारी (नागपूर महापालिका) राजेंद्र उचके यांनी दुजोरा दिला. तर पोलिस विभागाकडून मात्र, तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची गंभीर स्थिती लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वरिष्ठ पो. नि. प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक विभागाचे पो. नि. राजेंद्र पाठक, डीसीपी नूर उल हसन, अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झलके, तहसीलदार मोहन टिकले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असून, घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी सर्व ती मदत करावी – देवेंद्र फडणवीस
नागपुरातील वाडी येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना कळताच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हाधिकार्‍यांशी बोलून या घटनेसंदर्भात माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्यात. आवश्यक सर्व ती मदत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समीर मेघे यांनासुद्धा या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी आपण प्रार्थना करतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.