आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये! First charge from Aaban, now charge from Anil Deshmukh? Jayant Patel’s name in Home Minister race!

Share This News

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Bomb Scare), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी झाली, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे गृह मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. (Jayant Patil may get Home Ministry invariably after dismissing Anil Deshmukh)

अनिल देशमुखांचा वचक नसल्याची भावना?

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर आहे. मात्र गृह विभागावर टीकेची झोड उठली आहे. सचिन वाझे यांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे, परंतु गृहखातं राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही चिखलफेक होत आहे.

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृह खात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवार यांच्या मनात असल्याचं बोललं जातं. दुसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे प्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनिल देशमुख यांचं मनोधैर्य खचल्याचं चित्र आहे.

जयंत पाटलांकडे गृह मंत्रालय?

मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृह खात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना हे भाकित वर्तवलं.

जयंत पाटील का?

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे दिसते.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वरिष्ठतेच्या पातळीनुसार विचार केल्यास अजित पवारांनंतर जयंत पाटील यांचं नाव वरच्या स्थानी आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा भार अजित पवारांकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील रेसमध्ये अग्रेसर मानले जातात. (Jayant Patil may get Home Ministry invariably after dismissing Anil Deshmukh)

‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही’

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. त्यामुळे गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच कायम राहतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“या तर बाजारातल्या गप्पा”

अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं होतं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.