एसटीच्या इंधन बचतीत भंडारा विभागात प्रथम; गोंदिया चौथ्या स्थानी

Share This News

गोंदिया,-केपीटीएल (इंधन बचत) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एसटी महामंडळाच्या राज्यातील पाच विभागासह पाच आगारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून इंडियन ऑईल कार्पोरेशन लि.च्या वतीने चषक देऊन गौरविण्यात येते. ज्यामध्ये विभागामध्ये भंडारा विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर राज्यातील प्रथम पाच आगारात गोंदिया आगाराने चौथ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील महामंडळ सभागृह, मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात संबंधीत विभाग प्रमुख व आगार व्यवस्थापकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कमी इंधनात जास्त फेर्‍या करून अधिकचे महसूल गोळा करता यावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने राज्यस्तरावर केपीटीएल (इंधन बचत एव्हरेज) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्या आगार अथवा विभागातील एसटी बस इंधनाची बचत करून अधिक प्रवाश्यांची ने-आण करतात अशा विभाग अथवा आगाराची नोंद करून त्यांना पुरस्कृत करण्यात येतेे. या वर्षीच्या केपीटीएल (इंधन बचत) कार्यक्रम सन 2021 (सक्षम 2021) मध्ये राज्यातील पाच विभागाची नोंद करण्यात आली आहे. विभागामध्ये भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जालना या पाच विभागाची निवड करण्यात आली आहे. भंडारा विभाग प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आाहे. तर भंडारा विभागाअंतर्गत भंडारा विभागाने 52.38 च्या प्रमाणात इंधनची बचत करून अधिकचे उत्पन्न घेतल्याची नोंद आहे. वर्धा 51.05, चंद्रपूर 50.49, गडचिरोली 50.47 व जालना 49.80 हे विभाग अनुक्रमे द्वितीय, तृतिय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे सदर पुरस्कारासाठी निवड झालेल्या आगारांमध्ये भंडारा विभागातीलच आगार सर्वाधिक असून यात भंडारा विभागांतर्गत येत असलेल्या साकोली आगाराचा इंधन बचतीचा प्रमाण 54.32 आहे.

या आगाराने राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान पटकाविला आहे. तर तिरोडा आगार 53.33, गोंदिया आगार 52.73 व पवनी आगार 52.55 प्रमाणासह क्रमश: तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर सीबीएस-2 वर्धमाननगर नागपूर आगाराची दुसर्‍या क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. या आगाराचे इंधन बचत प्रमाण 54.26 कि.मी. आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील महामंडळ सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व पाचही विभाग नियंत्रक किंवा ते उपलब्ध नसल्यास विभाग यंत्र अभियंता (चालन) व सर्व निवड झालेल्या पाचही आगार व्यवस्थपक यांना केपीटीएल चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर तसे पत्रही संबंधित सर्व विभाग प्रमुख व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

इंधन संपणारी वस्तू असल्याने चालकांनी इंधनाची बचत करणे गरजेचे आहे. कार्यशाळेत काम करणार्‍या मेकॅनिक कर्मचार्‍यांनी इंधन गळती रोखावी. चालकांनी विशेष काळजी घेऊन इंधनाची बचत करावी. एक लिटर डिझेलमध्ये पाच किलोमीटरपर्यंत एसटी चालवलीच पाहिजे, या दृष्टीने चालकांनी नियोजन करावे. चालक, मेकॅलिक व कर्मचार्‍यांचे सहकार्य व प्रयत्नामुळे विभाग व गोंदिया, तिरोडा आगारांनी स्थान मिळविल्याचे गोंदियाच्या आगार व्यवस्थापक संजना पटले, सहायक कमर्मशाळा अधिक्षक झाडे यांनी म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.