पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

Share This News

नागपूर : गडचिरोलीतील कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत टिपागड भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोलीच्या सी-६०ने राबविलेल्या विशेष अभियानात पाच जहाल नक्षलवादी ठार झालेत तर अनेक जखमी झालेत.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात आले. खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलातील सी-६०च्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. सोमवार, २९ मार्चला सकाळी साडेसहा वाजता जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० नक्षलवादयांनी सी- ६० जवानांवर हल्ला केला व अंधाधुंद गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलात पळ काढला.
चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले. त्यावेळी घटनास्थळी तीन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी, राजू ऊर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम, अमर मुया कुंजाम, सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनिता गावडे, अरमिता ऊर्फ सुखलू पदा ही ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे नक्षलवादी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एक एके- ४७ रायफल, एक १२ बोअर रायफल, एक ३०३ रायफल, एक ८ एमएम रायफल, काही इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आदी जप्त केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.