बुलडाणा, चिखली, मलकापूर, खामगावसह पाच गावे प्रतिबंधित क्षेत्र
बुलडाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील पाच नगरपरिषद क्षेत्र प्रतिबंधित म्हणून सोमवारी प्रशासनाने जाहीर केले. बुलडाणा शहर, चिखली, मलकापूर, खामगांव व देऊळगावराजा या गावांमध्ये आता आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ ची आणखी कडक अंमलबजावणी होणार आहे.
सोमवार, २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत पाचही ठिकाणी कडक निर्बंध असतील. जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी हे आदेश काढले आहे. नव्या आदेशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध, औषधी, पीठगिरण्या सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात रात्री ८.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. परवानगी असलेले उद्योगच सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालय, बँका अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवांना प्रतिबंध लागू असेल. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू ठेवता येणार नाहीत. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असेल. लग्न समारंभात केवळ २५ व्यक्तींना परवानगी असेल. त्याची रितसर परवागगी तहसीलदारांकडून घ्यावी लागेल. खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामांसाठी वाहतूक करायची असल्यास संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.