वाशिम – ‘बर्ड फ्लू’विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करा – जिल्हाधिकारी
वाशीम
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणे समोर आली आहेत. त्या अनुषंगाने राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची पशुसंवर्धन, आरोग्य आणि इतर संबंधित सर्व विभागांनी जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ११ जानेवारी रोजी झालेल्या पशुसंवर्धन व आरोग्य विभागाच्या बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, राज्यात ‘बर्ड फ्लू’ झालेले पक्षी आढळले असले तरी अद्याप जिल्ह्यात अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही. भविष्यातही हा आजार जिल्ह्यात पसरू नये, यासाठी पशुसंवर्धन, आरोग्य, वन आणि लघुपाटबंधारे विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीफार्म चालक, पक्षीपालन करणार्या सर्वांना काय करावे, काय करू नये, याविषयी माहिती द्यावी. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी.
पोल्ट्रीमधील पक्षाचा संशयास्पद मृत्यू झाल्यास त्याची माहिती न लपवता तातडीने प्रशासनाला कळविण्याविषयी पोल्ट्रीफार्म चालकांना अवगत करावे. जेणेकरून सदर पक्षाचा मृत्यू हा नक्की कोणत्या कारणाने झाला आहे, याचे निदान करणे शक्य होईल. नागरिकांनी शहरी अथवा ग्रामीण भागात संशयास्पदरित्या मृत पक्षी आढळल्यास त्याविषयी त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवावे. वन विभाग, लघुपाटबंधारे विभाग यांनी आपापल्या आखत्यारीतील पाणवठे, तलावांवर व इतर ठिकाणी पक्षांचे मृत्यू आढळ्यास तातडीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.