वन विश्वरूप धन

Share This News

व्यक्तीची ध्येयप्रेरितता आणि वास्तव कृती इच्छित यश संपादन करते. प्रयत्नातून हवं ते आपल्या पुढयात आपण पाडून घेतो. यातून चक्क एक जंगल नावारुपास आलं तर नवल वाटण्याच कारण नाही. मात्र आजच्या घडीला जंगल घडविणारे अन वाचविणारे दुर्मिळच…! असे अवलिया निसर्गाला, स्वतःसकट समाजाला जीवन देण्याच कार्य करून जातात. नाशिकचे वन्यजीव अभ्यासक विश्वरूप राहा हे त्यातलच एक नाव..! निसर्गावर निस्सीम प्रेम करणारा, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग, ई. छंद जोपासणारा हा वल्ली त्याच्या नजरेतून बोरगडसारखा उजाड डोंगर सुटेल तरी कसा..? नाशिकच्या उत्तरेला १४ कि.मी. अंतरावर बोरगड डोंगर आहेत. रामशेज शेजारी असलेल्या बोरगडवर विश्वरूप राहा यांची नजर पडली. याच बोरगडच्या पायथ्याशी तुंगलदरा नावाचे एक गाव आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या पुढाकाराने ‘महिंद्रा हरियाली’ नावाने परिचित प्रकल्पातून त्यांनी जंगल तयार करण्याच्या हेतूने सात वर्षांचा वृक्षारोपणाचा आराखडा केला. साग, बांबू, शिसम, खैर, ऐन, अर्जून, आपट्यासह तब्बल दीड ते दोन लाख झाडे लावली. झाडे लावणे सोपे पण जगविणे त्याहून कठीण, मात्र हे आव्हान त्यांनी सहज पेलले. तुंगलदरा ग्रामस्थांचा यात सिंहाचा वाटा आहे. वन विभागाचे अरविंद पाटील व के. प्रदिप यांचेही यात मोठे योगदान आहे. भारतीय वायू सेनेच्या सुरक्षाकवचामुळे येथे नासधूस करणारे व उपद्रवी पोहोचू शकले नाही म्हणून हे जंगल आज आपल्याला फुललेले दिसते. कंदीलपुष्प नावाची एक दुर्मिळ वनस्पती देखील इथे आहे. याच्या एकूण आठ प्रजातींपैकी तीन प्रजाती इथे आढळतात. तसेच सात वर्षांनी फुले देणारी कारवी सुद्धा येथे दिसते. ही बाब येथे विशेषत्वाने नमूद करविसी वाटते.

दि. ३ मे २००८ मध्ये आपल्या वनखात्याने ‘बोरगड संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून जाहीर केले. हे महाराष्ट्रातील अश्या प्रकारचे ‘पहिलेच संवर्धन राखीव क्षेत्र’ आहे. वृक्षांशी नातं जोडणाऱ्या वृक्षप्रेमींनी आपल्या हातांनी झाडं लावून वाढवली. ‘बोरगड संवर्धन राखीव क्षेत्र पाहता पाहता लोकसहभागातून उभे राहिले. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या बोरगड डोंगर व किल्लाच्या कुशीत ३.४९ चौ.की.मी. परिसरात हे जंगल विस्तारलेलं आहे. वन विभाग, नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहभागातून हा परिसर वनात रुपांतरीत झाला. झाड म्हणजे नुस्त झाड नसतं तर ते अनेक जीवांना जीवन देणार असतं. म्हणूनच प्राणी, पक्षी, फुलपाखरं व कीटकसृष्टीही येथे नावारुपास आली.  यात बिबळ्या ही मागे नाही. नाशिक परिसरातील बिबळ्याना तर हक्काचे आश्रयस्थान मिळाले. तरस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, मुंगूस यांच्यासह वानरांचा कळप येथे सुखाऊ लागला. राष्ट्रीय पक्षी मोरासह ७० च्या वर प्रजातींची राहा यांनी येथे नोंद केली आहे. बोरगड किल्ल्याचा सोबती म्हणजे रामशेज किल्ला होय. याच किल्ल्याच्या कड्यांमध्ये घर करून राहणारे गिधाड पक्षी इथे नव्याने वास्तव्यास आले. गरूड, सातभाई, वटवट्या, अमूर ससाणा यांच्या गलबल्यात दयाळ आपल्या कर्णमधुर शिळेने आपल्याला खुणावतो. येथील बोरगड व रामशेज किल्ला चढाईला सोपा असून हा परिसर नाशिकहून फक्त १४ किमी अंतरावर आहे. एकदा तरी भेट द्यावी असेच हे जंगल आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या निसर्गरम्य बोरगडच्या आठवनी मनात कायम घर करून राहतील हे मात्र खरे….!

बोरगडच्या निर्मितीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. तुंगलदरा संयुक्त वन व्यवस्थापन समितीने येथे चराईबंदी व कुऱ्हाडबंदी केली. स्थानिक समुदाय स्वत:च्या मुलाप्रमाणे या जंगलाचे संरक्षण करतात. वन विभागही यात कुठेच मागे नाही. वनरक्षक ते वनसंरक्षक पदापर्यंत प्रत्येक जन आपआपली जबाबदारी चोख पार पडतात. वन विभाग, स्थानिक गावकरी आणि वन्यजीव प्रेमी या तिकडीच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या बोरगडने आपल्या समोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. या साखळीत नाशिक येथील वन्यजीव अभ्यासक स्व. श्री. विश्वरूप राहा यांचे नाव अमर झाले आहे. ‘पक्षी वाचवा जंगल वाचवा’ मोहीमकार, ओझर परिसरात माळढोकचा शोध, वाघेरा घाटातील रानपिंगळ्याचा शोध लावणाऱ्या या निसर्गदूताचे नुकतेच निधन झाले. मात्र बोरगडचे जंगल आजही त्यांच्या स्मरणात उभे आहे. हा ‘बोरगड पॅटर्ण’ संपूर्ण देशात राबविल्यास ‘हरित भारत’ झाल्याशिवाय राहणार नाही.  

@ यादव तरटे पाटील

    वन्यजीव अभ्यासक

दिशा फाउंडेशन, अमरावती

९७३०९००५००


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.