छापा कारवाईत माजी गृहमंत्र्यांची साडेदहा झाडाझडती

Share This News

नागपूरः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानावरील छापा कारवाईत सीबीआयच्या पथकानं त्यांची तब्बल साडे दहा तास चौकशी केली. या दरम्यान, पथकाने त्यांच्या निवासस्थानाहून काही दस्तऐवज देखील ताब्यात घेतले.
शनिवारी सकाळी आठच्या सुमारास देशमुख यांच्या सिव्हील लाईन्स परिसरातील निवासस्थानी सीबीआयचे पथक दाखल झाले. कारवाई आटोपून सायंकाळी साडेसहा वाजताच हे पथक त्यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडले. या कारवाईतील सीबीआयचे सर्व अधिकारी व कर्मचारी पीपीई किट घालूनच वावरत होते. बाहेर तैनात असलेल्या पोलीसांना या कारवाईची कुठलीच कल्पना देण्यात आली नव्हती. या कारवाईची कुणकुण लागल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यातून निवासस्थानासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईच्या वेळी अनिल देशमुख हे मुलगा सलील याच्यासह घरीच होते. त्यावेळी देशमुख हे नुकतान सकाळचा वॉक आटोपून घरी आले होते. पथकाने देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या काही शैक्षणिक संस्था, त्याच्या आप्तस्वकीयांच्या मालकीच्या काही खासगी कंपन्या याबाबत चौकशी केल्याची माहिती आहे. या संस्था आणि कंपन्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यात आले आहेत.

संपूर्ण सहकार्य केले-देशमुख

दरम्यान, सीबीआयच्या पथकाला चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य केले असल्याचा दावा देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, राजकीय आकसापोटी देशमुख यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने त्यांच्या समर्थनार्थ शनिवारी आंदोलन केले. घोषणाबाजी करणाऱ्या दहा ते बारा आंदोलनकर्त्याना सीताबर्डी पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.