चार आरोपींना अटक १२ जिवंत काडतुसांसह
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील सातगाव बसस्थानकानजीक हिरो शोरूमजवळील एका बंद हॉटेलमध्ये ५२ पत्त्यांच्या जुगारावर ३ जानेवारीला काही अज्ञात आरोपींनी त्यांच्या जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार करीत लुटमार केली. याप्रकरणी, पोलिसांना चार आरोपींना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून एकूण ६ लाख ८00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माहितीनुसार, फिर्यादी हर्षल विनोद पिंपळकर (२६), रा. फ्रेण्डस कॉलनी, वॉर्ड क्र.१ हा ३ जानेवारीला सातगाव येथील हिरो मोटरसायकल शोरूमनजीक बंद हॉटेलमध्ये मित्रांसह रमी खेळायला गेला. सायंकाळी चार वाजतादरम्यान काही अज्ञात बुरखाधारी इसमांनी खोलीच्या आत प्रवेश करून बंदुकीच्या धाकावर पैशांची मागणी केली. त्यांनी प्रतिकार केला. दोनदा हवेत गोळीबार करून पाच हजार रुपये लुटले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी एका लाल रंगाच्या कारमधून पसार झाले. घटनेची तक्रार फियार्दीने पोलिसात दिली असता अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४२, ४५२/३४, सहकलम ३/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आणि तपासाला प्रारंभ केला..
शनिवारला गुप्त माहितीच्या आधारावर मोहसीन अब्दुल रहमान बेरा (३६), रा.वॉर्ड क्र.१ जुनीवस्ती बोरी, सुरेंद्रकुमार रामपती यादव (३४), रा. अशोकनगर, ता. जिकानपूर, उत्तर प्रदेश, ह.मु. नंदनवन, नागपूर, आशुतोषराज गौतम सत्येंद्र मिर्शा (२५), रा. दीपिका, ता. कटदोरा, जि. कोरबा, छत्तीससगड, ह. मु. व्यंकटेशनगर, के.डी.के. कॉलेजजवळ, नागपूर, अंकित रमेश शुक्ला (३६), रा. आधारखेडा, लखनौ, उत्तर प्रदेश, ह.मु. व्यंकटेशनगर, केडीके कॉलेजजवळ, नागपूर असे घटनेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाल रंगाची स्विफ्ट कार (क्र. एमएच ४९/ बीबी ७९८८), एक गावठी पिस्तुलासह सात जिवंत काडतुसे, एक देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुस, चार अँण्ड्रॉईड मोबाईल, एक साधा मोबाईल, एक धारदार चाकू आणि पाच हजार रुपयांची रोख जप्त केली. आरोपींना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठाविण्यात आली.
सदर कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक राहुल माकनीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पो. निरीक्षक माणिक चौधरी, सतीश सोनटक्के, आशिष मोरखेडे, संजय भारती, मिलिंद नांदूरकर, सत्येंद्र रंगारी, राजू कापसे, राकेश तालेवार, विवेक गेडाम, पंकज ढोके यांनी केली.