मोठी बातमी-भारतात कोरोना लस निःशुल्क असणार- डॉ. हर्षवर्धन Free corona vaccination in India-Dr. Harshwardhan
नवी दिल्ली, : कोरोना लसीची मान्यता अंतम टप्प्यात असून भारतात सर्वत्र कोरोना व्हॅक्सीनचा ड्रायरन सुरू आहे. संपूर्ण देशात कोरोना लस निःशुल्क दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी केली. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे ? असा प्रश्न हर्षवर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात आरोग्यमंत्री म्हणाले की, देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला झाल्याचे त्यांनी सांगितले.