जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी परत जाता कामा नये : डॉ. नितीन राऊत
नागपूर : वर्षभर कोरोना कालावधीमुळे प्रलंबित असणाऱ्या सर्व कामांना पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र
एक करा. मात्र यावर्षी जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर असणारा निधी परत जाता कामा नये असे आवाहन ऊर्जा मंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन
समितीच्या आजच्या बैठकीत २०२१-२२ वर्षासाठी एकूण ८८४.९० कोटीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यासाठी ४११ कोटीची मर्यादा असून जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे ४७३ कोटीची अतिरिक्त मागणी
केली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये बीडीएस वरून निधी काढून घेण्यात आल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात निधी
अखर्चित राहिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्व
उर्वरित दोन महिन्यांमध्ये या वर्षीचा पूर्ण खर्च होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे निर्देशित करण्यात आले.
सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून मागितलेल्या
खर्चाच्या आराखड्यानुसार एकूण ८८४.९० कोटीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी
६१५.५८,अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी २०५.२२ आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६४.०९ असे एकूण ८८४.९०
कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिलेली तीनही योजनांसाठीची मर्यादा ४११.७०
कोटीची आहे. नागपूर जिल्ह्याने यावर्षी ४७३.१९ कोटीची अतिरिक्त मागणी केली आहे. आज जिल्हा नियोजन समितीने
या अतिरिक्त मागणीसह ८८४.९० कोटीचा आराखडा मंजूर करण्याचा ठराव घेतला. १२ फेब्रुवारीला मुंबई येथे जिल्हा
वार्षिक योजना अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक होत आहे या बैठकीमध्ये जिल्ह्याला अतिरिक्त किती निधी मंजूर
केला जाणार हे ठरणार आहे.
तत्पूर्वी आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी या बैठकीमध्ये तीर्थक्षेत्र आंबोरा येथील १७० कोटीच्या विकास
आराखड्याला मंजुरी दिली. जिल्ह्यातील काटोल उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय आजच्या
बैठकीमध्ये झाला. कोविड काळातील कार्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेचा अभिनंदनाचा ठराव आज
सर्व लोकप्रतिनिधींनी पारित केला. तर नागपूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या विधी विद्यापिठाला आर्थिक मदत देण्याची
घोषणाही आजच्या बैठकीत करण्यात आली. आजच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी दरवर्षीच्या समर्पित होणारा निधी,
अखर्चित निधी,याबद्दल चिंता व्यक्त केली. जो निधी खर्च होत नसेल तो अन्यत्र वळता करण्याबाबतची मागणी आजच्या
बैठकीत आमदारांनी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणांना दुरुस्ती व पुढे चालविण्यासाठी
योग्य प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना या बैठकीत युवक क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली. तर
जलसंधारणाच्या कामाला सर्वाधिक महत्त्व दिले गेले पाहिजे, ती कामे प्रलंबित राहता कामा नये, यासाठी अधिकाऱ्यांनी
वेळेत नियोजन करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या.
सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी केले.