दिल्लीतील रुग्णाला नागपुरातून रेमडेसिव्हिरची विक्री

Share This News

नागपूर : दिल्लीतील करोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकाला पाच जणांच्या टोळीने सात रेमडेसिव्हिर विकल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी छापा टाकून गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील कंत्राटीपद्धतीवर कार्यरत परिचारिकेला अटक केली. पल्लवी ऊर्फ प्रज्ञा मेश्राम हे अटकेतील परिचारिकेचे नाव आहे.
रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजार प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी भाजप नगरसेविकेचा दीर मनोज वामन कामडे (वय ४०, रा. न्यू डायमंडनगर, नंदनवन), अनिल वल्लभदास काकानी (वय ५२, रा. टेलिफोन एक्स्चेंज चौक), पृथ्वीराज देवेंद्र मुळीक (वय ३६, रा. रहाटे कॉलनी, धंतोली), आविन देवेंद्र शर्मा (वय ३२, रा. गावंडे ले-आऊट, नरेंद्रनगर) आणि अतुल भीमराव वाळके (वय ३६, रा. आयुर्वेदिक ले-आऊट, सक्करदरा) या पाच जणांना अटक केली. पाचही जण दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. या टोळीचा सूत्रधार अतुल वाळके हा असून पल्लवी ही त्याची मेहुणी आहे. पोलिसांनी पाचही जणांची चौकशी केली. चौकशीदरम्यान गडचिरोलीतील रुग्णालयात कार्यरत मेश्रामने १२ इंजेक्शन दिले. त्यापैकी पाच इंजेक्शन एक लाख रुपयांत दिल्लीतील रुग्णाच्या नातेवाइकाला विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मेश्रामला अटक केली. मेश्राम ही गत सात वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात काम करते. तिने आणखी कोणाकोणाला इंजेक्शन दिले याचा तपास पोलिस करीत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.