गडचिरोली:जारावंडी ग्रामसभेचा निर्णय अवैध दारू व तंबाखू हद्दपार करण्याचा निर्णय
गडचिरोली,दि.06ः- जिल्हा दारूबंदीला आमचे सर्मथन असून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तंबाखू व दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता इलाक्यातील २५ गावांतून अवैध दारू व तंबाखू हद्दपार करण्याचा निर्णय जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेने घेतला आहे.
जिल्हा दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी तालुक्यातील सिरपूर येथे जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेची बैठक बाबुराव आतला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी इलाका अध्यक्ष मसरू पोटावी, शिशुपाल नरोटे, रमेश दुग्गा, मानसु नैताम, बिजेश नरोटे, जानू कोल्हा, डोलू कोल्हा, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांच्यासह २५ गावातील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, गाव पाटिल, भूमय्या उपस्थित होते.
जिल्ह्यात शासकीय दारूबंदी नंतर शेकडो गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली. त्यामुळे दारूचा वापर कमी झाला. गावातील स्त्रिया व लोक संघटित होऊन गावाची दारूबंदी करीत आहेत. त्याचप्रमाणे जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेने देखील ठराव घेत महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करण्याची विनंती केली आहे. सोबतच इलाक्यातील २५ गावात देशी, विदेशी दारू विक्री बंद ठेवणे, पेसा कायद्याचा आधार घेत खर्राविक्री सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.