गाडे गुरूजी स्मृती सेवायोगी पुरस्कार डॉ.संध्या पवार यांना जाहीर
नागपूर
संस्कार परिवार नागपूर तर्फे दिला जाणारा पूज्य गाडे गुरूजी स्मृती सेवायोगी पुरस्कार पालकमैत्री अभियानाच्या संयोजिका डॉ.संध्या पवार यांना जाहीर करण्यात आला.
आचार्य विनोबा भावे यांच्या गिताईचे प्रचारक व संस्कार परिवाराचे प्रणेते पूज्य गाडे गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ समाजात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूज्य गाडे गुरुजी स्मृती सेवायोगी पुरस्कार प्रदान केला जातो. अकरा हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी हा पुरस्कार पालकमैत्री अभियानाच्या संयोजिका डॉ.संध्या पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. संध्या पवार या गेल्या ३० वर्षांपासून व्रतस्थपणे निराधार मुलींच्या संगोपनाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. आजतागायत त्यांनी ३७ मुलामुलींना आधार दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल संस्कार परिवाराने घेतली हे विशेष. पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ ला सकाळी ११:००वाजता वाजता सर्वोदय आश्रम नागपूर येथे ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांचे अध्यक्षतेखाली, सर्वोदय आश्रमचे विश्वस्त ॲड. आशुतोष धर्माधिकारी यांचे शुभहस्ते व सर्वोदय आश्रमचे सचिव ॲड. वंदन गडकरी आणि माजी संचालक नारायण जोशी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, असे संस्कार परिवारचे अध्यक्ष अ. रा. देशपांडे, सचिव शालिनी वैद्य यांनी कळविले आहे.