चक्रीवादळाचा गडचिरोलीला मोठा फटाका

Share This News

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. करोनासोबतच चक्रीवादळाच्या रूपाने दुहेरी संकट गडचिरोली जिल्ह्यावर आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते. काल शनिवारी १ मे रोजी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावात जवळपास ४० ते ४५ घरांची पडझड झाली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
देसाईगंज तालुक्यातही चक्रीवादळ आणि गारपीट झाल्याने नुकसान झाले. जोगीसाखरा, पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव परिसरात शेतकऱ्यांच्या धान, मका, आंबे, केळी पिकाची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त गावकाऱ्यांकडून केली जात आहे. मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक पक्ष्यांनाही जीव गमवावा लागला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.