निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गॅंगस्टर रणजीत सफेलकर ताब्यात

Share This News

नागपूर : बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नागपूरचा कुख्यात गॅंगस्टर रणजीत सफेलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणजीत सफेलकर पोलिसांच्या हाती लागल्याने नागपुरातील इतर अनेक मोठ्या गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी 2016 मध्ये झालेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने कुख्यात गॅंगस्टर रणजीत सफेलकरला तब्बल पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविली होती, असे तपासात समोर आले होते.
त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या सफेलकर टोळीतील नंबर दोन शरद ऊर्फ कालू हाटे आणि इतर काही गुंडांना अटक केली होती. मात्र टोळीचा म्होरक्या रणजीत सफेलकर फरार होता. त्याला काल रात्री पोलिसांनी अज्ञात ठिकाणावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सहा सप्टेंबर 2016 रोजी अग्रसेन चौक जवळील मिर्झा गल्लीत 72 वर्षांचे आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नंतर अनेक वर्षे या प्रकरणाचा उलगडा झाला नव्हता. नुकतंच पोलिसांच्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
आता सफेलकरला पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविणारा तो अज्ञात व्यक्ती कोण याचा उलगडा होण्याची शक्यता बळावली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.