जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २२ जानेवारीला
नागपूर
ग्रामीण विकासाचे केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवार २२ जानेवारी २0२१ रोजी होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेवर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. आता येत्या बैठकीत सत्ताधार्यांना अडचणीचे ठरणारे अनेक मुद्दे उपस्थित करण्याची तयारी सुरू केली आहे.
गत दोन महिन्यांपासून आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प आहे. तर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी अद्यापही वितरित झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी आरोप करणे सुरू केले आहे. तर अध्यक्षाही त्याच तोडीचे उत्तर देत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यात ग्रामीण भागात निवडणूक असल्याने विरोधकांच्या आवाजाला अधिकच धार आली आहे. विशेष म्हणजे १८ जानेवारीला सत्ताधार्यांना पदभार स्वीकारून वर्षपूर्ती होईल. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे. सत्ताधारी गत वर्षभरातील विकास कामांचा लेखाजोखा मांडतील. तर विरोध सत्ताधारी कसे अपयशी ठरले, याबाबत उहापोह करतील. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणार्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून रखडलेले विषय मार्गी लावण्याची शक्यता आहे.