दुर्धर आजाराची पूर्व तपासणी करुन घ्या-अमितेश कुमार
आजपासून दर शुक्रवार व शनिवारी होणार निशुल्क तपासणी
नागपूर, दि. 5 : पोलीस विभागात महिला सोबत पुरुष कर्मचाऱ्यांना वेळेअभावी कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेवून दुर्धर आजाराची पूर्व तपासणी करण्यासाठी निशुल्क शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातर्फे राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची कर्करोग पूर्व तपासणी करण्यात येणार असून हैद्राबाद हाऊस येथे आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते आज दीप प्रज्वलन व फीत कापून केले.आरोग्य उपसंचालक संजय जायस्वाल, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. के. आर. सोनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात पोलीस विभागातील कार्यरत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर इतर विभागातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. या शिबिरात विविध वैद्यकीय चाचण्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शिबीरात ट्युमर, मधुमेहासह विविध रोगांची निशुल्क तपासणी व तद्नंतर उपचार होणार आहे. पोलीसांनी कुटूंबियांलासुध्दा यात सहभागी करुन घ्या, शिबीर त्यांच्यासाठी अनिवार्य व महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.
पुर्व तपासणी आठवडयाच्या दर शुक्रवार व शनिवारी होणार आहे.आजाराचे प्रमाण महिलांमध्ये प्रकर्षाने जाणवते त्यामुळे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. बरेचदा निशुल्क शिबीर असल्याने त्यांचे महत्व जाणवत नाही, परंतु ही पोलीस व आरोग्य विभागांनी केलेली संयुक्तीक सूरूवात असून या शिबीराचा लाभ अवश्य घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
माझी कुटुंब-माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत विशेष शिबिरात स्त्रीरोग व प्रसुतीरोग तज्ञ डॉ. अनु भुते तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये अभियान संचालक, नॅशनल हेल्थ मिशन, नागपूर येथील समन्वयक श्रीमती गितांजली बुटी, श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. कुंतल सोनपुरे, आरुण्या फाऊंडेशन, नागपूर, आकार स्कूल ऑफ नर्सिंग, हिंगणा, श्री. गोविंदा मेडिकल एज्युकेशनॲण्ड रिसर्च सोसायटी यांचे सहकार्य लाभणार असल्याचे डॉ. सोनपुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या शिबीरास पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.