गोंदियाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन पुरवठ्यावर मात

Share This News

उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तहसीलदार आदेश डफळ यांच्या प्रयत्नांना यश

गोंदिया  ‘प्रयत्न कण वाळूचे रगडिता, तेल ही गळे!’ या म्हणीची आज प्रचिती आली. मनात आणले तर काहीही अशक्य नाही. यशस्वी होण्यासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही. फक्त सामान्य पद्दतीपेक्षा काही हटके केल्याने जी यशप्राप्ती होते, त्यातून मिळणारे समाधान हे काही औरच असते. असे कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही करावे तेवढे कमीच. असेच काहीसे कार्य गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तहसीलदार आदेश डफळ यांनी करून दाखविले आहे. त्यांच्या या कार्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

गोंदिया येथे श्याम इंटरप्राईजेस यांचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट आहे. या प्लांटमध्ये फक्त एका शिफ्टमध्ये काम सुरू होते. परिणामी, मोजके सिलेंडर रिफिल होत होते. अपुऱे तांत्रिक मनुष्यबळ ही त्यामागची मुख्य अडचण होती. त्यामुळे त्या प्लांटपासून ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नव्हता. दुसरीकडे जिल्ह्यात कोविड-19 महामारीने आपला उच्छाद मांडलेला आहे. वाढती रुग्ण संख्या आणि या रुग्णांना लागणारा ऑक्सीजनचा पुरवठा यामध्ये तारतम्य साधणे, ही प्रशासनासमोरील मोठी कसोटी होती. देशात आणि राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासन-प्रशासन ऑक्सीजन पुरवठा करणार तरी कसा, हा सुद्धा यक्ष प्रश्न ठरू पाहत होता. आपल्या लोकांचे जीव वाचविण्यासाठी युद्धस्तरावर उपाय योजना करणे आणि त्याला योग्य संसाधनांची सांगड घालणे फार अवघड ठरू पाहत होते. हे सर्व करीत असताना मानसिकता आणि कार्यक्षमता यावर पडणारा ताण, हे देखील आलाच.

अशा अवस्थेत ऑक्सीजनचा पुरवठा कसा वाढवता येईल, यावर मंथन सुरू झाले. श्याम एंचरप्राईजेसला तांत्रिक मनुष्यबळाची  नितांत गरज होती. गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून तिरोडा येथील अदानी पॉवर कंपनीकडे शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. त्यास अदानी पॉवर कंपनीनेसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. तांत्रिक मनुष्यबळ, शाम इंटरप्राईजेस आणि सिलेंडर भरण्यासाठी लागणारे मजूर ,हमाल, तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाहतूक, त्यांची जेवण्याची, राहण्याची व्यवस्था या सर्व बाबी उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि तहसीलदार गोंदिया यांनी अगदी अल्प वेळेत घडवून आणल्या. आणि बघता बघता आज रात्री नऊ वाजता पासून महसूल विभागाच्या मार्फत अदानी पॉवर कंपनीच्या तंत्रज्ञांच्या मदतीने गॅस रिफिलिंग ची दुसरी शिफ्ट शाम इंटरप्राईजेस येथे सुरू करण्यात आली.

या अधिकाऱ्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध व्हायला फार मोठी मदत होणार आहे. अधिकाऱ्यांच्या या कार्यामुळे अनेक प्रभावीत लोकांना ऑक्सीजन अभावी होणारा त्रास बऱ्याचप्रमाणात कमी होण्यात मदत मिळेल, अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. मनात आणले तर महसूलअधिकारी अशक्यही शक्य करून दाखवू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जवळजवळ अशक्य वाटणारे हे काम अगदी अल्प कालावधीत यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि तहसीलदार गोंदिया यांचे मनापासून आभाळभर कौतुक आणि अभिनंदन!


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.