नेटवर्कच्या शोधात ‘गोंडवाना’चे विद्यार्थी गोंदिया, छत्तीसगडच्या जंगलात

Share This News

नागपूर : कोरोनामुळे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ ऑनलाइन पेपर घेत आहेत. अशात नेटवर्कच नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गोंदिया आणि छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलात वणवण भटकावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.


गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावित आहे. त्यामुळे येथे केवळ बीएसएनएलचे मोबाइल नेटवर्क आहे. इंटरनेटची कमी स्पीड आणि सिग्नलच्या समस्येचा फटका येथील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. अनेक विद्यार्थी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन परीक्षा दत आहेत. तर काही नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत असलेल्या जंगलात पोहोचले आहेत. त्यानंतरही नेटवर्क उपलब्ध न झाल्याने गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. अशात गडचिरोलीतील कोरचीत मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळविताना विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागली. अनेक विद्यार्थी गडचिरोलीपासून ३० किलोमीटरवर असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या चिंचगड सीमेवर पोहोचले. काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ऑनलाइन पेपर सोडवताना काही अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला कळवावे. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. तसे परिपत्रकच विद्यापीठाने काढले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.