कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ,प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

Share This News

·            भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात

·            लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

नागपूर, दि. 26 :   नागपूर जिल्ह्यात साधारण एक लाख तीस हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मे ते ऑगस्ट याकाळात भीषण परिस्थिती होती. मात्र या कालावधीत न डगमगता नागपूर जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रण करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेने उत्तम काम केल्याची पावती पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिली.  प्रशासनाला नागपूरकर जनतेने देखील उत्तम साथ दिली. प्रारंभीच्या हतबलतेपासून तर आताच्या लसीकरणांपर्यंतचा हा कोविड लढा जनता, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या सामूहिक दृढतेचा विजय असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.

कोरोना महामारीत विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रणात आला. कोरोना काळात बेडची उपलब्धता, ऑक्सिजन, रेमिडीसीवर औषध व कोविड केंद्रांची उपलब्धता यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक व अन्नधान्य  वितरण, गृह विभाग या विभागांनी उत्कृष्ट समन्वयांसह मोलाची कामगिरी केली. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेमुळे घरोघरी आरोग्य यंत्रणा पोहोचली. शासनाने एकूण 169 कोटीची मदत कोरोना उपाययोजनासाठी केली. डॉक्टर, पोलीस, मदतनीस,सफाई कामगार, शासकीय कर्मचारी यासगळया स्तरातील घटकांनी केलेली मदत हा माणुसकीचा गहिवर असल्याचे पालकमंत्र्यांनी कृतज्ञतेने सांगीतले. 

जिल्हयात 2 हजार 344 कृषी पंपाना जोडणी देण्यात आली आहे. निसर्ग वादळाने कोकणात केलेल्या नुकसानात उर्जा विभागाने उत्तम काम केले. उर्जा विभागाच्या विविध योजनांना गतिमान करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.                 

कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 43 हजार खातेधारक शेतकऱ्यांना 370 कोटी रुपयाची कर्जमाफीचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नोकर भरतीसाठी शासन प्रयत्नरत आहे. युवाशास्त्रज्ञ श्रीनभ अग्रवाल यांची राष्ट्रीय बालपुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. पद्मश्री मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ तसेच साहित्यिक नामदेव काबंळे यांचाही गौरवपर उल्लेख पालकमंत्र्यांनी केला कोविडवर लस आली असली तरी सर्वानी अजुनही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व शारिरीक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्राथम्य देण्यात येत आहे. व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी काळ आरोग्यदायी ठरण्याच्या शुभेच्छांसह पालकमंत्र्यांनी भाषणाचा समारोप केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.