नागपूर: गुंगीचे औषध देऊन तरुणाने केला वर्गमैत्रिणीवर अत्याचार

Share This News

Nagpur Girl Rape By Man In Jaripatka Area

एका तरुणाने वर्गमैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या तरुणाने अत्याचाराचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेलही केले होते.जरीपटका पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुंगीचे औषध देऊन युवकाने वर्गमैत्रिणीवर अत्याचार केला. या अत्याचाराची मोबाइलद्वारे चित्रफीत काढून तिला ब्लॅकमेलही केले. तरुणीने जरीपटका पोलिस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी युवकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सौरभ संतोष तिवारी (वय २७ रा. पद्मावतीनगर, गोधनी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सौरभ हा औरंगाबादमधील कंपनीत काम करतो. पीडित २६ वर्षीय तरुणी ब्युटिशियन असून, ती आई व भावासह जरीपटका भागात राहाते.

पीडित तरुणी व सौरभ चौथ्या वर्गापर्यंत सोबत शिकले. २०१७ मध्ये शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. यात सौरभ व पीडित तरुणीही आहेत. याचदरम्यान दोघांची ओळख झाली. २०१८ मध्ये सौरभला औरंगाबादेतील कंपनीत नोकरी लागली. त्याने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. लग्नाची मागणी केली. विचार करून निर्णय घेईल,असे तरुणी त्याला म्हणाली.

दरम्यान, कंपनी बघण्यासाठी सौरभने पीडित तरुणीला औरंगाबादला बोलाविले. हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले. तरुणी औरंगाबादला गेली. सौरभने तिला हॉटेलमध्ये न नेता फ्लॅटवर नेले. हॉटेलबाबत विचारणा केली असता सौरभने खोली नसल्याचे सांगून तिची समजूत घातली. तो कंपनीत गेला. रात्री परतला. त्याने तरुणीला पाणी प्यायला दिले. पाणी पिताच तरुणी बेशुद्ध झाली. सौरभने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची मोबाइलद्वारे चित्रफीत काढली. पहाटे तरुणी शुद्धीवर आली. अत्याचार झाल्याचे तिला समजले. तिने सौरभला जाब विचारला. लग्न करण्याचे आमिष सौरभने दाखविले. त्यानंतर सातारा, पुणे व नागपुरात विविध ठिकाणी सौरभने तिच्यावर अत्याचार केला. मोबाइलमधील चित्रफीत व छायाचित्र दाखवून तिला ब्लॅकमेल केले. काही दिवसांपूर्वी सौरभचे अन्य एका तरुणीसोबत साक्षगंध झाल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. तरुणीने सौरभला विचारणा केली. सौरभ व त्याच्या नातेवाइकांनी तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सौरभचे वडील पोलिस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

ट्रकमध्ये अत्याचार

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीवर ट्रकच्या केबिनमध्ये अत्याचार केला. ही घटना जरीपटका भागात घडली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोलू सिंग ऊर्फ गुरुप्रीतसिंह गिडल (वय २५, जरीपटका) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित २० वर्षीय तरुणीला गोलूने लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाबाबत बोलायचे असल्याचे सांगून ऑक्टोबर महिन्यात गोलूने तरुणीला पाटणकर चौकात बोलाविले. तरुणी तिथे आली. गोलूने बळजबरीने जवळीलच उभ्या ट्रकच्या केबिनमध्ये तरुणीला नेले. अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.