‘पदवीधर’मध्ये २३ टक्के मतदान वाढले

Share This News

विभागात सरासरी ६० टक्के मतदान; नागपूर जिल्ह्यात ६१ टक्के; वाढीव मतदान कोणाच्या पत्थ्यावर?

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ५८ ते ६० टक्के मतदान झाले,  मतदानाची  ही टक्केवारी २००८ (५२.५५)आणि २०१४ (३७ टक्के ) च्या तुलनेत अधिक आहे.  २०१४ च्या तुलनेत यावेळी  २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मतदारांची संख्या ८१ हजाराने कमी झाल्यावर मतदानाच झालेली वाढ कोणाच्या पत्थ्यावर पडणार याची चर्चा मतदान पूर्ण होताच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पदवीधरमध्ये एकूण १९ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे संदीप जोशी आणि महाविकास आघडीचे अभिजित वंजारी यांच्यातच होती. मतदानाची सुरूवातच उस्फूर्ततेने झाली. सांयकाळी ५ वाजेपर्यंत ५८ ते ६० टक्के मतदान झाल्याचे सरकारी सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र अंतिम आकडेवारी रात्री उशिरा जाहीर झाली नव्हती.

२०१४ मध्ये एकूण नोंदणीकृत २ लाख ८७ हजार मतदारांपैकी १ लाख ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०२० मध्ये एकूण नोंदणीकृत २ लाख ६ हजार मतदारांपैकी सरासरी  १ लाख २३ हजार ६०० मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या तुलनेत या निवडणुकीत २३,५२७  अधिक मतदारांनी मतदान केले. ही वाढीव मते कोणाच्या पदरात पडणार हे मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे.

या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील मतदार निर्णायक ठरतात, असे आजवरची आकडेवारी दर्शवते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागपूर जिल्ह्यात १ लाख २  हजार ८९९ मतदारांपैकी ६७२१४  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मतदानाची टक्केवारी

  • नागपूर- ६१.००
  • भंडारा- ५७.७७
  • चंद्रपूर- ७२.४७
  • गोंदिया- ६३.६८
  • गडचिरोली-७२.३७
  • वर्धा- ६५.३२

मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी झाल्याने मतदान वाढले. याचा फायदा भाजपलाच होईल. मतदार यादीतून अनेक नावे गहाळ झाली, अन्यथा मतदान ७० टक्के झाले असते. – संदीप जोशी, उमेदवार भाजप.

वाढीव मतदान सकारात्मक परिणाम करणारे ठरेल. आम्ही याकडे परिवर्तनाच्या नजरेने बघतो. मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली होती. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसून आले. ग्रामीण भागातही चांगले मतदान झाले. – अभिजित वंजारी, उमेदवार, महाविकास आघाडी


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.