पदवीधर मतदार येत्या मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात

Share This News

नागपूर पदवीधर निवडणूक : संग्राम अवघ्या दोन दिवसांवर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता दोन दिवसांवर आली असून, येत्या मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होईल. विभागातील २ लाख ६ हजार ४५४  मतदानाचा हक्क मतदार बजावणार आहेत. १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. करोनापासून बचावासाठी सर्व उपाययोजना करण्यात करण्यात आल्या असून मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी पीपीई किट देण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदार घेण्यात येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. मतदारांनी सुरक्षित वावर तसेच मास्क घालूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २ हजार ८०९ मतदार असून, १६४ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. विभागात एकूण ३२२ मतदान केंद्र आहेत. आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार आहे.

दृष्टिक्षेपात…

जिल्हा : मतदार

नागपूर : १,०२,८०९

वर्धा : २३,०६८

भंडारा : १८,४३४

गोंदिया : १६,९३४

गडचिरोली : १२,४४८

चंद्रपूर : ३२,७६१

एकूण : २,०६,४५४

मतदान केंद्र असे

नागपूर : १६४

वर्धा : ३५

भंडारा : २७

गोंदिया : २५

चंद्रपूर : ५०

गडचिरोली : २१

-तर ठरेल मत बाद

एकाच उमेदवाराच्या नावासमोर १, २, ३ असा पसंतीक्रम लिहिल्यास ते मत अवैध समजले जाणार आहे. मतदार केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाने पसंतीक्रम लिहावा. अन्य पेनने लिहिल्यास मत अवैध होईल. प्रथम पसंती दर्शविली नसल्यास मत अवैध होईल. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या मतदाराने कोणत्याही पेनाने पसंती दर्शविली तरी मत वैध ठरविण्यात येणार आहे. हे अपवादात्मक आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एकल संक्रमणीय पद्धतीने पसंतीनुसार मतदान केले जाणार आहे. मतदारांना जांभळ्या रंगाचा विशिष्ट पेन निवडणूक आयोगाकडूनच दिला जाईल. याच पेनाने आपल्या मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या नावासमोर पसंतीचा क्रम टाकून मतदान करायचे आहे.

हे ओळखपत्र दाखवा

मतदारयादीत नाव असणाऱ्या मतदारांनी ओळखपत्र दाखवून मतदान करायचे आहे. आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट, राज्य शासनाचे सेवा ओळखपत्र, खासदार-आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, शिक्षणसंस्थेतील सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी-पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र या ओळखपत्रांपैकी कुठलेही एक असेल तर मतदान करता येईल.

इथे शोधा नाव

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदारयादीतील नाव तसेच मतदान केंद्राची माहिती गुगल सर्च या लिंकवर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारांनी http://103.23.150.139/GTSearch2020/ ही लिंक गूगल सर्चवर टाकल्यास मतदारयादीतील अनुक्रमांक, मतदाराचे नाव व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध आहे. पदवीधर मतदारांना मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे, यासाठी गुगल सर्चची लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघाची मतदारयादी निवडणूक आयोगाच्या http://ceo.maharashtra.gov.in/gtserch1/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

मतदारयादीत चुका

मतदारयाद्यांमध्ये नावाच्या पुनरावृत्तीसह अनेक चुका असल्याचे पुढे आले आहे. गूगलच्या भाषांतरामुळे अनेक मतदारांच्या नावात चुका राहिल्या असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कबूल केले. इंग्रजीतील नाव आणि मराठीतील नावात बदल असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. तांत्रिक चुकांमुळे कुणाचेही मत बाद होणार नाही. संबंधित नावाची खात्री करून मतदान करण्यास परवानगी देण्याच्या सूचना मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

३ डिसेंबरला मतमोजणी

गुरुवार, ३ डिसेंबर रोजी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.