ग्रामपंचायत निवडणूक : ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ग्रा.पं.साठी इच्छुक असलेल्या ३२२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३१२० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) ग्रा.पं.च्या ७ जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रा.पं.आधीच अविरोध झाली होती. दरम्यान, सोमवारी सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. येथे ७ जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यातील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूकही अविरोध झाली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवार (दि. ५) पासून गावागावांत राजकीय फड रंगणार आहेत. १३ जानेवारी रोजी प्रचारतोफा थंडावतील. नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार आहे. मात्र, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी वेगवेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे येथील राजकीय पारा चढला आहे. यात कामठी, कुही आणि नागपूर (ग्रामीण) मधील काही ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यामुळे काही गावांत दुरंगी, तर काही गावांत चौरंगी लढत होईल.